श्रीनगर,दि.21: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगात योगाबद्दल उत्साह आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभाग घेतला. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या आहेत. योग आता मर्यादित व्याप्तीतून बाहेर येत आहे.
योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, मला काश्मीरमध्ये येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. योगातून जी शक्ती मिळते, ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत आहे. मी काश्मीरच्या भूमीतून योग दिनानिमित्त देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे.
ते म्हणाले की, आता मी जगात कुठेही जातो, जागतिक नेते आता योगाबद्दल बोलतात. ज्याला संधी मिळेल तो योगाची चर्चा करू लागतो. जगभरातून लोक अस्सल योग शिकण्यासाठी भारतात येतात. आज जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगाकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. योग आता सतत नवनवीन विक्रम करत आहे.
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर ही योग आणि ध्यानाची भूमी आहे. यामुळे उत्पादकता आणि तग धरण्याची क्षमता वाढते. योगाच्या माध्यमातून नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. योग हे केवळ शिक्षण नसून एक शास्त्र आहे. योगामुळे एकाग्रता वाढते. आता योगावर संशोधन सुरू आहे. पर्यटनात योग हा नवीन ट्रेंड बनला आहे.
ते म्हणाले की, यावर्षी फ्रान्समधील 101 वर्षीय महिला योग शिक्षिकेला भारतात पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. ती कधीच भारतात आली नाही पण तिने आपलं संपूर्ण आयुष्य योगाबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी समर्पित केलं. आज देशातील आणि जगातील नामांकित विद्यापीठे आणि संस्थांमध्ये योगावर संशोधन केले जात आहे. योगावरील शोधनिबंध प्रकाशित होत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरातून लोक केवळ अस्सल योग शिकण्याची इच्छा असल्यामुळेच भारतात येतात. सध्या जर्मनीमध्ये 1.5 कोटी योग प्रशिक्षक आहेत. आज जग एक नवीन योग अर्थव्यवस्थेला पुढे जाताना पाहत आहे. ऋषिकेशपासून केरळपर्यंत योग पर्यटनाचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. आज विमानतळांपासून हॉटेल्सपर्यंत योगासाठी विशेष सुविधा दिल्या जात आहेत. योगाशी संबंधित कपडे आणि उपकरणे बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. लोक त्यांच्या फिटनेससाठी वैयक्तिक योग प्रशिक्षकांची नेमणूक करत आहेत. कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी योगा आणि माइंडफुलनेस कार्यक्रमही सुरू करत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.