दि.९: Narendra Modi Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, भाजपने हरल्यानंतरच जिंकायला सुरुवात केली आहे. आपण अनेक पराभव पाहिले आहेत, डिपॉझिट जप्त झाल्याचे पहिले आहे. एकदा जनसंघाच्या काळात निवडणूक हरल्यावरही मिठाई वाटली जात होती, विचारले हरल्यावर मिठाई का वाटली? तेव्हा आमच्या तिघांचे डिपॉझिट वाचल्याचे सांगण्यात आले.
जातीयवाद, भाषिकवाद, प्रांतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे काँग्रेसच्या कार्यशैलीचा आणि विचारसरणीचा आधार आहे. हे या देशाच्या मुख्य प्रवाहात राहिले तर देशाचे किती मोठे नुकसान आहे. देशाची आज जी अवस्था झाली त्याला सर्वात जास्त जबाबदार काँग्रेस आहे. या देशात जितके पंतप्रधान होते, मी, अटल बिहारी वाजपेयी सोडून सर्व काँग्रेसच्या शाळेतीलच आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
जय-पराजय आम्ही दोन्ही पाहिलेत. आम्ही जेव्हा विजयी होतो तेव्हा जास्तीत जास्त जमिनीशी नाळ तुटू न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही निवडणूक जिंकलो तरी लोकांची मनं जिंकण्यात कुठेही कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं मन जिंकण्याचं काम करतो. ज्या गोष्टीतून लोकांना समाधान मिळतं आम्ही तेच करतो असंही मोदींनी सांगितले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नेहरुंच्या विधानावर मोदींचे स्पष्टीकरण
मी कुणाच्या आईवडिलांना, आजी-आजोबांना काही बोललो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं ते सांगितले. मी म्हटलं होतं की, एका पंतप्रधानांचे विचार काय होते तेव्हा काय स्थिती होती. आणि आज पंतप्रधानांचे विचार काय आहेत आणि स्थिती काय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित जवाहरलाल नेहरुंवरील चर्चेवर स्पष्टीकरण दिले.
आम्हाला ५ राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल
मी या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. भाजपाची लाट आहे. प्रचंड बहुमताने भाजपा जिंकेल. या ५ राज्यातील जनता भाजपाला सेवा करण्याची संधी देईल. ज्या राज्यांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेने आम्हाला ओळखलं आहे. आमच्या कामाला पाहिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोनासाठी आप, काँग्रेस जबाबदार
कोविड महामारीत सर्व म्हणत होते जिथे आहात तिथेच राहा. काँग्रेसनं लोकांना फ्री तिकीट देऊन प्रवास करण्यास प्रोत्साहन दिले. दिल्लीत आम आदमी पक्षानेही व्हॅनमध्ये भरभरुन झोपड्यांमधील लोकांना सांगितले तुम्ही लवकर जा, इथं लॉकडाऊन होणार आहे असं सांगत कोरोनासाठी आप, काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.