मुंबई,दि.5: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे हे टी शर्ट, घड्याळ हे लाखो रुपयांचे वापरतात असा गौप्यस्फोट केला होता. वानखेडे यांचे राहणीमान, कपडे हे पंतप्रधान मोदींपेक्षा महाग आहे, असा आरोप केला होता. त्यावरुन आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकांवर जोरदार टीका केली आहे.
मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांवर जोरदार टीका केली. नवाब मलिक लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये जातातच कशाला? ही चांगली सवय नाही, असा सणसणाटी टोला राणेंनी मलिक यांना लगावला. तसेच, कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. तुमचं काही बाहेर काढलं तर अवघड होईल, असा इशाराही नारायण राणेंनी मलिकांना दिला.
नारायण राणेंनी शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राणे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे 56 आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.