मुंबई,दि.६: जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा ९ दिवस उपोषण केलं होतं. मंत्रिमंडळाच्या शिष्टाईनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरुच आहे. अशात जिजाऊंचे वंशज असलेल्या नामदेवराव जाधव यांनी मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केला असं म्हटलं आहे. तसंच एक गंभीर आरोपही त्यांच्यावर केला आहे.
नामदेवराव जाधव काय म्हणाले?
“शरद पवार मराठा आरक्षणावर कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं ते कायम का म्हणतात? मराठा समाजाचं म्हणणं आहे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या. आम्हाला कुणाच्या हक्कांवर गदा आणायची नाही. ज्यावेळी शालिनीताई पाटील या विषयावर आक्रमक झाल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
मराठ्यांचीच जिरवली…
मराठा आरक्षणाला सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर विरोध शरद पवारांनी केला. आमचं दुर्दैव हे आहे की शरद पवारांनी मराठा म्हणून सगळीकडे मिरवलं आणि मराठ्यांचीच जिरवली. इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये जेव्हा बातम्या येत तेव्हा स्ट्राँग मराठा मॅन असे मथळे यायचे. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचं आणि महाराष्ट्रात मराठा म्हणून मराठ्यांची जिरवायची हे दुटप्पी वागणं आहे. व्ही. पी. सिंग यांना मंडल आयोगाचं श्रेय जाणार होतं त्याआधी घाईने हा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि मराठ्यांचं नुकसान केलं. ” असा आरोप नामदेवराव जाधव यांनी केला.
निकष का लावले जात आहेत?
“मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. आत्महत्या करणारे तरुण हे मराठा समाजातलेच सर्वाधिक आहेत. यापेक्षा कुठला निकष अजून सरकारला हवा आहे? आमच्यातले काही लोक पुढारलेले आहेत. पण जे पुढारलेले आहेत ते पुढारीच आहेत. त्यांच्याकडे पाहून संपूर्ण गावाचं मॅपिंग करु शकत नाही. आम्हाला निकषांच्या चौकटीत अडकवलं जातं आहे कारण आरक्षणाची बस फुल झाली आहे. त्यात जागाच नाही. मात्र हे दिसू नये म्हणून काळ्या काचा लावल्या गेल्या आहेत. लोकांना वाटलं पाहिजे म्हणून तिकिटं काढा, रांगेत उभे राहा या सगळ्या औपचारिकता केली जाते आहे असंही नामदेवराव जाधव यांनी म्हटलं आहे.”
मराठा आरक्षण शरद पवारांनी घालवलं
“शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण घालवलं. जे मराठे यादीत १८१ क्रमांकावर होते त्यावर फुली मारली गेली आणि १८२ क्रमांक तसंच १८३ क्रमांकावर अनुक्रमे तेली आणि माळी होते. त्यांना आरक्षणात घेतलं गेलं. ओबीसींची पहिली यादी जेव्हा तयार झाली त्यात १८० जाती होत्या. सुधारित यादीत १८१ क्रमांकांवर मराठा, १८२ क्रमांकावर तेली तर १८३ ला माळी होते. मग क्रमांक १८१ गायब कसा झाला? जे आरक्षण ११ टक्के होतं ते १४ टक्के झालं तेव्हा लेव्हा पाटील, लेव्हा कुणबी आणि लेव्हा पडीदार या तीन जातींचा समावेश केला तेव्हा त्यांची कुठली कागदपत्रं घेतली गेली होती? कोणते आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध झाले होते? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण १४ वरुन २७ टक्क्यांवर नेलं मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून तेली आणि माळी या दोन जातींचा समावेश केला.“
शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं
“शरद पवारांनी हा निर्णय नेमक्या कोणत्या दबावाखाली घेतला? त्यांच्यापुढे कोणत्या अडचणी होत्या? केंद्रात मंडल आयोग लागू होत होता, त्यावेळी व्ही. पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी त्यांच्या आधी पुरोगामी निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी शरद पवार यांनी मराठ्यांचं भविष्य गाडून टाकलं. आता यावर हे सांगितलं जातं आहे की त्या GR वर शरद पवारांची मुख्यमंत्री म्हणून सही नाही, राज्यपालांची सही आहे. मात्र जेव्हा कुठलाही जीआर निघतो तेव्हा त्यावर राज्यपालच सही करतात मुख्यमंत्री नाही. ” असंही नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट केलं.