पालघर,दि.१६: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून तरुणीवर शारीरिक अत्याचार करणे, लग्नाचे झूठे आश्वासन देणे आणि बळजबरीने धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी एका जिम ट्रेनरविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप उसळला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जिम ट्रेनर आरिफ आयुब शेख याने एका २३ वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक शोषण केले. एवढेच नव्हे तर, पीडितेवर बुरखा परिधान करण्यासाठी आणि स्वतःचा धर्म बदलण्यासाठी सतत दबाव टाकला गेला. पीडितेने या प्रकारास विरोध केल्यावर तिला घरात डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
कुटुंबीयांचा सहभाग अन् मोबाईलमध्ये सापडले धक्कादायक पुरावे
या गंभीर गुन्ह्यात केवळ मुख्य आरोपीच नव्हे, तर त्याच्या घरच्यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची आई रुकसाना आणि चुलत भाऊ साहिल शेख यांनीही या कृत्यात त्याला साथ दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून तांत्रिक तपासणी केली असता, त्यातून अत्यंत आक्षेपार्ह बाबी बाहेर आल्या आहेत. आरोपीच्या फोनमध्ये शेकडो अश्लील व्हिडीओ आणि इतर महिलांचे फोटो सापडले असून, यावरून आरोपी अशा प्रकारे अनेक तरुणींना फसवण्याच्या ट्रॅपमध्ये सक्रिय असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची कठोर कारवाई
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरिफ शेख, त्याची आई आणि चुलत भावाविरोधात बलात्कार, जबरदस्तीने डांबून ठेवणे, मारहाण आणि धमकावणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक तपास करत असून, आणखी काही पीडित तरुणी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








