छत्रपती संभाजीनगर,दि.2: MVA Sabha: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहेत. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हणत भाजपावर जोरदार टीका केली.
जर वल्लभभाई नसते, तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही, हा प्रश्न आहे. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. पण तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या ना. घुसवा फौजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये. निवडणुका आल्या की लुटुपुटूचं काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या असे ठाकरे म्हणाले.
आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही आहोत. देशात एक विधान, एक निशाण असं तुम्हाला राबवायचं आहे. दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाहीये. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. सावरकरांचं स्वप्न होतं आसिंधू-सिंधूपर्यंत अखंड हिंदुस्थान. वर बसलेल्यांची हिंमत आहे का? अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. मी म्हटलं मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेकाचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. तिकडे टाका ना धाडी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा | MVA Sabha
भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, नितीश कुमार आणि लालूंचं सरकार पाडून तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? आता मोदी म्हणतायत की त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम चाललंय. कोण करतंय? आम्ही करतोय का? आमची प्रतिमा नाहीये का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय.
हे जगतमित्र आहेत. ओबामांनाही हाय ओबामा, काय रे ओब्या असं म्हणतात. सगळेच यांचे मित्र. इस्रायलमध्ये लाखोंच्या संख्येनं नागरिक, पोलीस, सगळे अधिकारी संपावर गेलेत. रस्त्यावर उतरलेत. राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांना झापलं. असे राष्ट्रपती पाहिजेत. तिथे पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं. अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यायला लागला. याला म्हणतात लोकशाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही वाट्टेल ते करावं आणि आम्ही मेंढरासारखं बे बे करत तुमच्या मागून यायचं ही लोकशाही नाही.