सभेला उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली, अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.३: छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची (MVA) सभा झाली. या सभेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून वेगवगळे राजकीय अर्थ काढण्यात येत होते. यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही ते ताठ बसता येईल, अशी खुर्ची वापरतात. म्हणून सभेच्या ठिकाणीदेखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यात खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापने वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचे का? असा प्रश्न विचारल्याचा गौप्यस्फोट अरविंद सावंतांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातली होती, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

काय म्हणाले अरविंद सावंत?

एक सभेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “शरद पवार म्हणाले होते, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

अजित पवारांचे स्पष्टीकरण

अरविंद सावंत यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वच गोष्टींचा आदर केला आहे. अतिशय कष्ट घेऊन आमचे घराणे पुढे आले आहे. पण, अरविंद सावंतांनी सांगितले, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही,” असे अजित पवार म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here