मुंबई,दि.2: MVA Meeting: आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. मुंबईत (Mumbai) आज बुधवार, 2 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमध्ये (MCA The Lounge) रात्री साडेसात वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
MVA Meeting | हे नेते उपस्थित राहणार
या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत देशभरातील अनेक विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येत आहेत. विरोधकांच्या या आघाडीचं नाव इंडिया (INDIA) असं ठेवण्यात आलं आहे. विरोधकांची तिसरी बैठक पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीमुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक महत्त्वाची समजली जात आहे.
दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि आमदार भाजपसोबत गेले आहेत. मात्र, शरद पवार मविआसोबत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी अनेकांची भूमिका होती. शरद पवारांच्या उपस्थितीतवर ठाकरे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडीच्या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांनी 5 ऑगस्टला बोलावली मविआची बैठक
दुसरीकडे शरद पवार यांनी 5 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीद्वारे शरद पवार मविआ नेत्यांची नाराजी दूर करतील, असं म्हटलं जात आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.