सोलापूर,दि.१५: करमाळा तालुक्यातील रावगाव येथील वसंत केकान खून खटल्यातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अश्विन भोभे यांनी मंजूर केला आहे. महादेव उत्तम ढाकणे, कल्याण ढाकणे, जयदत्त ढाकणे, सुमित ढाकणे, दिनकर ढाकणे, अरुणा ढाकणे, उर्मिला ढाकणे, खुशवार्ता ढाकणे आणि वंदना ढाकणे अशी जामीन मंजूर झालेल्या नऊ आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी आणि आरोपींमध्ये शेतीच्या वहिवाटीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून २० जून २०२६ रोजी फिर्यादी शुभम केकान शेताची ट्रॅक्टरने मशागत करत असताना, आरोपींनी हत्यारांसह हल्ला चढवून शुभम केकान यांना मारहाण केली आणि त्यांचे वडील वसंत केकान यांचा खून केला, असा आरोप फिर्यादी शुभम केकान यांनी केला होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींनी यापूर्वी बार्शी सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की, आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप मोघम स्वरूपाचे असून, नेमक्या कोणत्या आरोपीने मयतास मारहाण केली हे फिर्यादीत स्पष्ट नमूद केलेले नाही. तसेच, मयताचा मृत्यू आरोपींच्या मारहाणीमुळे झालेला नाही आणि घटनेच्या दिवशी आरोपींनी फिर्यादीविरुद्ध दिलेल्या फिर्यादीला शह देण्यासाठीच त्यांना या प्रकरणात खोटेपणाने गुंतवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी वरील नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या खटल्यात सर्व आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी, तर सरकारतर्फे ॲड. एस. एच. यादव यांनी काम पाहिले.







