सोलापूर,दि.२२: सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोमवारपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी शुक्रवारी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. सोलापूर शहरातील पॉझिटिव्हिटी दर वीस टक्क्याहून अधिक असल्याने शहरातील शाळा सोमवार पासून सुरू करू नये असे आदेश देण्यात आले आहेत. एक आठवड्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे परवानगी दिली आहे, मात्र स्थानिक पातळीवर याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांची शुक्रवारी ऑनलाइन या शहरातील घेण्यात आली. यात बैठक मुख्याध्यापकांच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. यात सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक मुख्याध्यापकांनी चिंता व्यक्त केली. तसेच काही शाळांमध्ये शिक्षकही कोरोना संक्रमित झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. दरम्यान, शाळा सुरू करण्याचा आदेश येईपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत शाळा समिती आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची बैठक घेण्यात यावी. तसेच पालकांचे कल जाणून घेण्याची सूचना प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी दिले.
जिल्हा परिषद शाळांचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर हे या प्रस्तावावर निर्णय घेणार आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तरी या प्रस्तावावर निर्णय झाला नव्हता. दरम्यान, जिल्हा परिषदेने आपल्याला प्रस्ताव दिला असून त्यानुसार कोरोनाची सध्याची स्थिती विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.