जावयावर खुनी हल्याप्रकरणी सासू सासरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२४: जावयावर खुनी हल्ला प्रकरणी सासू सासरे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यातील फिर्यादी मनोज बापू चौधरी यांच्या डोक्यात हातोडा, सत्तूरने, काठीने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरा सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण यांना सोलापूर येथील मे. सत्र न्यायाधिश एस. एस. जगताप यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, फिर्यादी मनोज बापू चौधरी यांचे सदाशिव विश्वनाथ चव्हाण यांच्या मुलीबरोबर तीन वर्षापुर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सदाशिव विश्वनाथ चव्हाण यांची मुलगी म्हणजेच फिर्यादीची पत्नी ही तिच्या माहेरच्या लोकांच्या सांगणेवरुन फिर्यादीशी वादविवाद करुन तिच्या माहेरी निघुन गेली होती. त्यामुळे फिर्यादी व त्याच्या पत्नीने परस्परांविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार कोर्टात चालु असताना देखील आपसात मिटवून फिर्यादीची पत्नी फिर्यादीकडे नांदावयास आली होती.

परंतू तरी देखील फिर्यादीचे सासरचे लोक अधुन मधन फिर्यादीच्या पत्नीस भरवून फिर्यादी व त्याच्या पत्नीमध्ये भांडण लावत होते. दि. २०.०१.२०२१ रोजी फिर्यादीचे मेहुणे हणमंत चव्हाण, विठ्ठल चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण, सासू मैनाबाई चव्हाण हे फिर्यादीच्या घरी येवून फिर्यादीच्या भावाला काठ्याने मारहाण करीत असताना फिर्यादी व त्याची आई भांडण सोडवताना मेहुणा हणमंत चव्हाण यांनी फिर्यादीला खल्लास करतो म्हणून हातोडा फिर्यादीच्या डोक्यात मारून तर विठ्ठल चव्हाण यांनी सत्तुरने मारून तसेच सासू सासरे यांनी हाताने व काठीने फिर्यादीच्या आईला मारहाण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी फिर्यादीचा सासरा सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण यांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजित इटकर, ॲड. राम शिंदे यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला होता.

सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपींच्या वतीने ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे यांनी असा युक्तिवाद केला की, यातील फिर्यादीला सत्तुरने मारल्याची कुठलीही कापीव जखम झालेली नाही तसेच संशयितांनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांविरूध्द फिर्याद दाखल केलेली आहे. त्यामुळे फिर्यादीने चिडून जावून आरोपीविरूध्द सदरची फिर्याद दाखल केल्याचे नाकारता येत नाही. असा युक्तिवाद केला, तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा सासरा सदाशिव चव्हाण, व सासू मैनाबाई चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन सोलापूर येथील सत्र न्यायाधिश एस. एस. जगताप यांनी मंजूर केला. यात आरोपींच्यावतीने ॲड. अभिजीत इटकर , ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे, ॲड. मनोज व्हनमारे, ॲड. युवराज आवताडे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here