दि.29: US Accident: अमेरिकेत (America) एका हायवेवर एकापाठोपाठ एक वाहने आदळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ (Video) यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील महामार्गावर (Pennsylvania highway) सोमवारी झालेल्या भीषण अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. येथे बर्फाच्या वादळामुळे महामार्गावर एकामागून एक 50 ते 60 वाहने आदळल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्याचवेळी इतर अनेक जण जखमी झाले. पेनसिल्व्हेनिया हायवेच्या (Pennsylvania highway) शुयलकिल काउंटीमध्ये (Schuylkill County) हा अपघात झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला असून, त्यात एकामागून एक वाहने आदळताना दिसत आहेत. बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचे नियंत्रण कसे सुटत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील विजिबिलिटी (दृश्यमानता) जवळपास शून्य होती, त्यामुळेच हा अपघात इतका भीषण होता. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुयलकिल कंट्रीमध्ये या महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.