मोहोळ, मैंदर्गी नगरपरिषद निवडणूक जिल्हा न्यायालयाने दिला हा निर्णय

0

सोलापूर,दि.२६:  मोहोळ, मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीतील दाखल अपिलावर जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सदर प्रकरणाबाबत सविस्तर हकीकत अशी की, सदर मोहोळ नगरपरिषद, मोहोळ सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणूकीमध्ये प्रभाग ५ब मधून श्री अविनाश तुकाराम पांढरे यांनी सर्वसाधारण गटातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दि17/11/2025 रोजी भरला होता आणि सदर अर्जाची छाणणी दि.18/11/2025 रोजी ठेवण्यात आली होती.  सदर अर्जाच्या छाणणीच्या वेळी निवडणूक अधिका-यांच्या असे लक्षात आले की, जे शपथपत्र पांढरे यांनी दाखल केले आहे, त्या शपथपत्रामधील काही रकाने रिकामे ठेवले तर काही रकान्यांमध्ये निरंक असे शब्द वापरण्यात आले होते.  

सदर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व राज्य शासनाच्या वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र हे परिपूर्ण भरलेले असावेत, असे असतानादेखील सदर उमेदवाराने त्यास त्रुटी कळवूनसुध्दा त्या उमेदवाराने सदर सुधारित शपथपत्र निवडणूक अधिका-याकडे मुदतीत सादर केले नाही, त्यामुळे अविनाश पांढरे यांचे नामनिर्देशनपत्र दि१८/११/२०२५ रोजी नामंजूर करण्यात आलेले होते. 

सदर आदेशाविरुध्द अविनाश पांढरे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांचेकडे अपील दाखल करुन सदर निवडणूक अधिका-याचा आदेश रदद करण्यात यावा आणि त्यांचे नामनिर्देशनपत्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली होती. सदर अपीलास निवडणूक निर्णय अधिका-यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी तीव्र हरकत घेवून शासनाच्या वतीने म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद केला की, सदर निवडणूक लढविणा-या उमेदवाराने शपथपत्रातील संपूर्ण मजकुर व संपूर्ण रकाने भरणे कायदयाने आवश्यक असून त्यासंबंधात भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूकनियम १९६६ च्या कलम १३ प्रमाणे छाणणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करु शकतो.  

सदरचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यासाठी आवश्यक अशी जी कारणे आहेत त्यामध्ये उमेदवाराचे शपथपत्र हे परिपूर्णरित्या भरणे गरजेचे व आवश्यक आहे  सदरची त्रुटी ही गंभीर स्वरुपाची असल्याने, सदर त्रुटीची दुरुस्ती करण्याची पुरेपूर संधी उमेदवारास देवूनसुध्दा त्याने ती केली नसल्याने सदर निवडणूक अधिका-यांनी अविनाश पांढरे यांचा अर्ज नामंजूर केला असून सदरचा आदेश कायदयाने योग्य असून त्यामध्ये कोणतीही बेकायदेशीर गोष्ट झालेली नाही. सदरचा युक्तिवाद ग्राहय धरुन सोलापूरचे जिल्हा न्यायाधीश राजवैदय यांनी अविनाश पांढरे यांनी दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे .  

अविनाश पांढरे यांचे वतीने ॲड एन. के. शिंदे यांनी काम पाहिले तर सरकारपक्षाच्या वतीने ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

सदर मैंदर्गी नगरपरिषद, मैंदर्गी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणूकीमध्ये प्रभाग 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीसीसी वुमन ६अ या आरक्षित जागेमधून श्रीमती परवीनबानो म. मुजीब बांगी यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दि.16/11/2025 रोजी भरला होता आणि सदर अर्जाची छाणणी दि.18/11/2025 रोजी ठेवण्यात आली होती.  

सदर अर्जाच्या छाणणीच्या वेळी शमीमबानो महिबूब दफेदार यांनी परवीनबानो यांच्या अर्जास लेखी हरकत नोंदविली आणि कथन केले की, सदर नामनिर्देशनपत्रामध्ये त्यांचे नांव परवीनबानो म. मुजीब बांगी असे नमूद केले असून त्यांचे मतदार यादीमधील नांव हे बाबुडे परवीनबानो बीबी अमीना ईमाम असे आहे आणि सदर अर्जदारांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रामध्ये मतदार यादीतील नांव नमूद करणे आवश्यक असतानासुध्दा त्यांनी तसे न केल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी मागणी केलेली होती.  

सदर निवडणूक अधिका-यांनी सदर संपूर्ण कागदपत्रांची नामनिर्देशनपत्राची छाणणी करुन तसेच सदर राज्य निवडणूक आयोगाच्या व राज्य शासनाच्या वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्रामध्ये मतदार यादीतील नांव नमूद करणे आवश्यक आहे असे असतानादेखील सदर उमेदवाराने त्यास सदरच्या त्रुटी कळवूनसुध्दा त्या उमेदवाराने सदर नामनिर्देशनपत्रामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करुन ते नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिका-याकडे मुदतीत सादर केले नाही, त्यामुळे परवीनबानो बांगी यांचे नामनिर्देशनपत्र दि.१८/११/२०२५ रोजी नामंजूर करण्यात आलेले होते.  

सदर आदेशाविरुध्द परवानीबानो बांगी यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांचेकडे अपील दाखल करुन सदर निवडणूक अधिका-याचा आदेश रदद करण्यात यावा आणि त्यांचे नामनिर्देशनपत्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली होती.  सदर अपीलास निवडणूक निर्णय अधिका-यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदिपसिंग राजपूत यांनी तीव्र हरकत घेवून शासनाच्या वतीने म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद केला की, सदर निवडणूक लढविणा-या उमेदवाराने नामनिर्देशनपत्रामध्ये नमूद नांव हे मतदार यादीतीलच असणे गरजेचे व आवश्यक असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंबंधात भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक नियम १९६६ च्या कलम १३ प्रमाणे छाणणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करु शकतो.  

सदरचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यासाठी आवश्यक अशी जी कारणे आहेत त्यामध्ये उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र हे मतदारयादीतील नमूद नांवाप्रमाणेच भरलेले असावेत व तसे गरजेचे व आवश्यक आहे.  सदरची त्रुटी ही गंभीर स्वरुपाची असल्याने, सदर त्रुटीची दुरुस्ती करण्याची पुरेपूर संधी उमेदवारास देवूनसुध्दा त्याने ती पूर्ण केली नसल्याने सदर निवडणूक अधिका-यांनी परवीनबानो बांगी यांचा अर्ज नामंजूर केला असून सदरचा आदेश कायदयाने योग्य असून त्यामध्ये कोणतीही बेकायदेशीर गोष्ट झालेली नाही.   

सदरचा युक्तिवाद ग्राहय धरुन सोलापूरचे जिल्हा न्यायाधीश राजवैदय यांनी परवीनबानो बांगी यांनी दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. परवीनबानो बांगी यांचे वतीने ॲड. निलेश ठोकडे यांनी काम पाहिले तर सरकारपक्षाच्या वतीने ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.

उज्वला थिटे यांनी अनगर नगरपंचायत, अनगर मधून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. सदरचा अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांनी नामंजूर केल्याने त्यांनी देखील जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले असून सदर अपिलास जिल्हा सरकारी वकील यांनी हरकत घेवून शासनाचे म्हणणे सादर केले आहे. सदर अपीलाची सुनावणी आज दि.२६/११/२०२५ रोजी सकाळी ११.००वाजता ठेवण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here