अपघातग्रस्त कारमधील व्यक्तीला मोहम्मद शमीने केली मदत

0

नवी दिल्ली,दि.26: अपघातग्रस्त कारमधील व्यक्तीला मोहम्मद शमीने मदत केली आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी क्रिकेटच्या पिचवर आपला जलवा दाखवत असतो. तो विरोधी फलंदाजांना कोणतीही संधी देत नाही. पण क्रिकेट व्यतिरिक्त तो वैयक्तिक आयुष्यात खूप भावनिक आणि नम्र व्यक्ती आहे. क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर शमी रिलॅक्स मोडमध्ये आहे. सध्या तो नैनितालमध्ये सुट्टी घालवत आहे.

त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. मोहम्मद शमीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हे खूप भाग्यवान आहेत, देवाने त्यांना दुसरं आयुष्य दिलं आहे.

नैनितालमधील यांची कार डोंगराळ रस्त्यावरून खाली खड्ड्याच्या दिशेनं पडली. ते माझ्या गाडीच्या समोरून जात होते. आम्ही त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढलं’. व्हिडिओमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्याचे सहकारी अपघातग्रस्त कारजवळ उभे असल्याचं दिसत आहे.

मोहम्मद शमी हे भारताच्या वनडे विश्व कप मोहिमेतील प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये एक प्रमुख नाव होतं. दुर्दैवाने टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावं लागलं. अनुभवी वेगवान गोलंदाज शमीने विश्वचषकातील 7 सामन्यात 10.71 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या लीग टप्प्यातील पहिल्या 4 सामन्यांमध्ये तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here