नवी दिल्ली, दि.11: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आरोग्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, कॅबिनेट सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन प्रकारांमुळे कोविडची वाढती प्रकरणे पाहता तयारीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे देशातील नागरिकांच्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे.