मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही

0

सोलापूर,दि.3: सोलापूर जिल्ह्यातील 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी. सर्व संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित ठेवावा. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या प्रशिक्षणाची उजळणी व्यवस्थित  करून निवडणुका निष्पक्ष, निर्भय व शांततामय वातावरणात यशस्वीपणे होण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर यांनी केले.  

नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथीलेश  मिश्र व रुपाली ठाकूर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्व साधारण निवडणूक निरीक्षक मिश्र पुढे म्हणाले की, पोलीस विभागाने आज सायंकाळ पासून पुढील 72 तास अत्यंत दक्ष रहावे. कुठेही कॅश व दारू वितरण अथवा वाहतूक होत असेल तर ते तात्काळ थांबवून जप्त करावे. कोणत्याही भागात गैर कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त तसेच केंद्र व राज्य राखीव बलाचा फोर्स नियुक्त करावा. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चौक ठेवावा. तेथील पोलीस कर्मचारी वारंवार मतदान केंद्रात न जाता केंद्राच्या बाहेर राहून मतदारांची रांग व्यवस्थित ठेवणे व तिथे कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होत असून निवडणुक मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे तरी सर्व यंत्रणांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून त्याची प्रभावीपणे आम्लबजावणी करावी. निवडणूक यशस्वीपणे पार पाडणे एक सांघिक काम असल्याने सर्वांनी परस्परास समन्वय ठेवावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. तसेच उष्णतेचे तीव्रता लक्षात घेऊन मतदाराबरोबरच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर यांनी केले.

मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत  ई व्ही एम मशीन अत्यंत संवेदनशील विषय असल्याने मतदान केंद्रावर कर्मचारी मशनरी घेऊन जाताना व्यवस्थितपणे त्याची हाताळणी करावी. कोणत्याही मतदान केंद्रावर कोणालाही मोबाईल आत मध्ये घेऊन जाता येणार नाही. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणे ते परत स्ट्रॉंग रूम मध्ये घेऊन येण्यापर्यंतचे सर्व बारकावे पुन्हा सांगितले. मतदान केंद्राध्यक्ष यांनी दिलेल्या सूचना संबंधित नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐकून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. तसेच लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना उष्णतेपासून बचावासाठी मंडप, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, मतदान केंद्राची स्वच्छता, रॅम्प, व्हीलचेयर, ओ आर एसचे पाणी, रांगेच्या मध्ये खुर्च्या किंवा बेंच आदी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी सर्व मतदारांनी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा व जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 70 टक्के पेक्षा जास्त जाईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

यावेळी शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्रावर पोलीस विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी यांनी त्यांच्या वतीने निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here