रामनवमीचे औचित्य साधून मनसेने शिवसेना भवनासमोर लावली हनुमान चालीसा, पोलिसांनी केली कारवाई

0

मुंबई,दि.१०: मनसेने रामनवमी निमित्त शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा लावली. मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलं आहे. मनसेनं राज्यातील विविध भागात मंदिरात हनुमान चालीला लावत आंदोलन केलं आहे. तर, आज मनसेनं शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण करत शिवसेनेला डिवचलं आहे. पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाढव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा लावल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आज चक्क मनसेने मुंबईतील ‘शिवसेना भवन’समोर हनुमान चालिसा पठण केलं.

मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा भोंगाद्वारे लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच भोंगे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का? असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here