अहमदनगर,दि.२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना परिवहन मंत्रीच जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी यावेळी केली आहे.
शेवगाव आगारातील चालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन शेवगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य केले. काकडे यांच्या मूळ गावी आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबातील सुनीता काकडे, मुले सतीश काकडे, महेश काकडे, मुलगी ज्योती घनवट, भाऊ शिवाजी काकडे यांचे त्यांनी सांत्वन केले. मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी काकडे यांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना धोत्रे म्हणाले, काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बलिदान दिले आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासंबंधी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. एसटीचे कर्मचारी जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. प्रवाशांसाठीही व कर्मचाऱ्यांसाठीही एसटी वाचली पाहिजे. अशीच भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही आहे. महाविकास आघाडी व भाजप सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अनावश्यक गोष्टींवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, परिवहन कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. करोना काळातही मनसेने रस्त्यावर उतरून नागरिकांना प्रत्यक्ष मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, गोकुळ भागवत, एसटी कर्मचारी संघटनेचे दिलीप लबडे, संजय धनवडे, संतोष सोंडे, दिलीप बडधे, इस्माईल पठाण उपस्थित होते.