मुंबई,दि.६: ED ने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली असे ट्विट करत मनसे नेत्याने संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित ११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर मंगळवारी टाच आणली. राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता या नव्या मुद्द्यावरुनही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. अशाचत आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडत खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.
माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल, अशा शब्दात राऊत यांनी कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच, महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल, असेही राऊत यांनी सांगितले.
सकाळी नऊच्या सुमारास अमेय खोपकर यांनी संजय राऊतांचा थेट उल्लेख टाळत एक ट्विट केलंय. “मशिदींच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” असं खोपकर यांनी म्हटलंय. कालच राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यावर उपहासात्मक पद्धतीने खोपकर यांनी हा टोला लगावलाय.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याचं आवाहन करत तसं न झाल्यास आम्ही मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू असं म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत शिवसेनेचे प्रवक्ते असणाऱ्या संजय राऊतांना खोपकर यांनी राष्ट्रवादीचा भोंगा असं थेट उल्लेख न करता म्हटलंय.