मुंबई,दि.३१: आत ठेवा नाहीतर बाहेर पण संजय राऊत यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी विशेष परवानगी द्या असे म्हणत मनसेने संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील मोठ्यासंख्येने जमू लागले आहेत. पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेने देखील संजय राऊतांना यावरून खोचक टोला लगावला आहे.
“महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल” असं म्हणत मनसेने राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “काहीही करा पण विश्वप्रवक्ते यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापासून वंचित ठेवू नये ही “ED”ला नम्र विनंती… (आत ठेवा नाहीतर बाहेर पण त्यांना त्यासाठी विशेष परवानगी द्या) नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल” असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे. संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.”
पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता.