मुंबई,दि.१४: शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. त्यात शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तांमध्ये छापण्यात आली. या जाहिरातीनंतर भाजपा नेते नाराज झाले. त्यानंतर पुन्हा सारवासारव करत शिवसेनेकडून दुसरी जाहिरात देण्यात आली. परंतु या जाहिरातबाजीवरून शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर शिवसेना नेत्यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?
शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ५० वाघ आहेत आणि यांच्यामुळेच भाजपाच्या मंत्र्यांना सत्तेत स्थान आहे. एखाद्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची काम करण्याची पद्धत जनतेला पसंत असेल तर त्याची वाहवाह करू शकते. ते पचवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे. एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा देणे, ठाण्यापुरती मर्यादित ठेवणे हे बोलण्याआधी तुम्ही किती मर्यादित होते, कोणाच्या बळावर तुम्ही मोठे झाले. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून तुम्ही मोठे झाले, नाहीतर तुमची काय औकात होती? असा घणाघात त्यांनी केला. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल बोलताना आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करताना खासदार अनिल बोंडे यांनी आत्मचिंतन करून बोलायला पाहिजे असंही गायकवाड यांनी म्हटलं.
तर खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते लोकप्रिय आहेत त्यांच्याबाबत शंका कुशंका करण्याची गरज नाही. आमच्या नेत्यांबद्दल जर कुणी अशाप्रकारे बोलले तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला.
ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागलं आहे, असे बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.