सोलापूर,दि.11: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षण मागणीची तीव्रता पाहून व मराठा बांधवांच्या भावनांचा विचार करून येत्या शुक्रवारपासून विशेष अधिवेशन घ्यावे यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे ठिय्या आंदोलन करणार आहेत.
बार्शीतील शिवसृष्टीसमोर रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे ठिय्या आंदोलन होणार आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची मुख्य मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे ही आहे.
यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन सर्व राजकीय पक्षांनी व सर्व आमदारांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर करण्यासाठीच्या मागणीसाठी आमदार राऊत येत्या नगरपालिकेसमोरील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा शिवसृष्टी येथे हे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. तरी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.