जळगाव,दि.25: ट्रक चालकाकडून पोलीस जबरदस्तीने वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आमदाराने स्वतः स्टिंग ऑपरेशन करून याचा पर्दाफाश केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने स्टिंग ऑपरेशन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात चाळीसगाव पोलिसांकडून ट्रकचालकांकडून जबरजस्तीने वसुली केली जात आहे. घाट बंद असतांना देखील ट्रकचालकांकडून जबरीने 100 ते 1000 रुपये घेवून पोलिसांकडून गाड्या सोडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार भाजप आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी उघडकीस आणला आहे.
आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालवित आणून या प्रकाराचे स्ट्रिंग ऑपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या वसुली करणाऱ्यांनी आमदारांना शिव्या दिल्याचेही दृश्य चित्रित झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खात्री करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला.
आमदारांना मागितले पैसे
त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. त्यानतंर मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला. या घटनेनतंर आमदार चव्हाण यांनी या ठिकाणी असलेल्या ट्रकचालकांची चर्चा केली. त्या चालकांनी या ठिकाणी नेहमी वसुली केली जात असल्याचे सांगीतले.
दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून 500 ते 1000 रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन 5 ते 10 तास घाट जाम होतो, गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात. यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव बदनाम होत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगीतले आहे.