आमदार अपात्र प्रकरण, ठाकरे गट आणि शिंदे गटाची न्यायालयात याचिका

0

मुंबई,दि.१६: आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष असल्याचे व भरत गोगावले प्रतोद असल्याचा निकाल दिला. दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले.

ठाकरे गट आणि शिंदे गटांची न्यायालयात याचिका

ठाकरे गटाच्यावतीने नार्वेकर यांच्या १० जानेवारी रोजीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, तसेच ही याचिका निकाली निघेपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेण्यापासून मनाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका सोमवारी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) दाखल केली. तर आमचा व्हिप मान्य असताना ठाकरे गटाचे १४ आमदार निलंबित का केले नाहीत, असा सवाल करत शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. 

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ११ मे रोजी निकाल देताना अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना निश्चित कालावधीत निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदे किंवा ठाकरे यापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही, असा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी दिला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here