सोलापूर,दि.22: सोलापूर येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हाट्सअँप मेसेज आधारे हरवलेल्या एका आजींना त्यांच्या नातलगापर्यंत पोहचवले आहे. सोलापूर शहरातील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेले 72 तासापासून एक आजी निपचित बसून आहेत, असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला. त्यात मेसेज पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता, नंबर काहीही नव्हते.
फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्ती जाधव यांना फोन करून शोध घेण्याची विनंती केली. तो ब्लँक मेसेज भक्ती जाधव यांनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आजी त्यांच्याजवळ असल्याचे कळले.
यातूनच आटपाडी पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्ती जाधव यांना कळले. त्यानुसार हालचाली करून, पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी ता. आटपाडी जि. सांगली येथून या आजीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटवून, आजीशी सविस्तर बोलून समजूत काढून, आटपाडी पोलीस ठाण्याला संपर्क करून पंढरपूर येथे दर्शनास येऊन दोन महिन्यापासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आजींना सुखरूप नातलगाच्या स्वाधीन केले.
72 तासात बिस्किटे खाऊ घालून आजीची काळजी घेणारे, त्याबाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच याकामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्ती जाधव यांनी आभार मानले आहेत. तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी जेष्ठ मंडळी हरवण्याचे अगर नातलगचं त्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क रहाण्याबाबत विनंती केली आहे.