अल्पवयीन मुलाने केले मतदान, जिल्हा पंचायत सदस्याविरुद्ध एफआयआर

0

भोपाळ,दि.10: मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा जागेसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. यादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये एक बालक मतदान करताना दिसले. आता याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेच्या तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झालं असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान 13 मे, 20 मे आणि 1 जून रोजी होणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

भोपाळचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान करून त्याचा व्हिडिओ बनवून तो शेअर केल्याच्या प्रकरणाची भोपाळचे जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांच्या सूचनेवरून जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीठासीन अधिकारी संदीप सैनी यांच्यासह संपूर्ण पोलिंग पार्टीला निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी आपल्या मुलाला भोपाळ जिल्ह्यातील बैरसिया तहसीलमधील मतदान केंद्र क्रमांक 71 खितवास येथे मतदान केल्याची माहिती आहे . त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी भोपाळ यांनी या प्रकरणाचा तपास एसडीएम बेरासिया यांच्याकडे सोपवला होता.

तपासानंतर जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांच्याविरुद्ध बेरासिया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी संदीप सैनी आणि त्यांचे सहाय्यक सीआर बाथम, मनोजकुमार मौर्य आणि मदन गोपाल पटेल यांना या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here