मिलिंद देवरांनी दिला कॉंग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

0

मुंबई,दि.14: काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी कॉंग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीत दक्षिण मुंबई लोकसभेची जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी आग्रही होते. यावरून काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) पक्षात मतभेद वाढले होते.

लोकसभेची जागा काँग्रेसला सुटावी म्हणून ठाकरे गटाविरोधात वक्तव्य करणारे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांनी X वर याबाबत पोस्ट केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवरा काँग्रेसमध्ये नाराज असून ते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे.दक्षिण मुंबई लोकसभा जागा कोणाची यावरुन ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढलेयत.यात ही जागा ठाकरे गट लढणार असल्याने मिलिंद देवरांनी नाराजी व्यक्त केली.त्यामुळे देवरा आज शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

दक्षिण मुंबई लोकसभेतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडणूक लढवणार आहेत. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे.

देवरा कुटुंबाचे गांधी परिवाराशी निकटचे संबध आहेत. पण दक्षिण मुंबईतील राजकीय परिस्थिती देवरा यांच्या फायद्याची दिसत नाही. येथे त्यांना अरविंद सावंत यांचे आव्हान आहे. अशावेळी ते शिंदे गटात जाऊन आपली जागा बळकट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉंग्रेस हायकमांड देवरा यांची नाराजी दूर करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here