माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.15: माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकांत अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. येरवडा कारागृहाशेजारी पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असताना त्यांनी 2010 मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे लिहितांना त्यांनी अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.

पुस्तकात काय लिहिले आहे?

आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली.

पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होते. या जागेचा लिलाव झाल्याचे त्यांनी मला सांगितले. जास्त बोली लावणाऱ्यांसोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी पालकमंत्र्यांना मी सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात इतकी मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला जागेची गरज आहे. नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. परंतु त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला, असं बोरवणकरांनी पुस्तकात म्हटलं आहे. येरवडा कारागृहाशेजारील पोलिसांची तीन एकर जमीन खासगी बिल्डरला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here