मुंबई,दि.18: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. पण मनोज जरांगे पाटील सरकारचं ऐकून घेण्यास तयार नाहीत.
मराठा समाजाचे आंदोलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची मनधरणीचे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत त्या तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीला आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीच्या अनुषंगाने सर्व प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबीर आयोजित करून प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला गती मिळणार आहे. मुख्य सचिवांच्या या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. पण तरीही त्यांनी एक अट सरकारपुढे ठेवली आहे.
“ज्या 54 लाख मराठ्यांची नोंद सापडली आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना 20 तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या आणि सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर मार्ग काढला, असं दाखवा तेव्हा आम्ही विचार करु. तुम्ही आता आदेश काढणार आणि प्रमाणपत्र चार महिन्यात देणार तर ते चालणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.