नांदेड,दि.17: मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना विरोध होताना दिसतोय. शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आयोजित बैठक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना शासकीय विश्रामगृहात बैठक, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा निर्धार करत मराठा आंदोलकांनी ही सभा उधळून लावली आहे. शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरात पाठींबा मिळत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी गावबंदीचा निर्णय काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. मात्र, असे असतांना राजकीय कार्यक्रमांवरचा बहिष्कार कायम आहे. उद्धव ठाकरे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दुपारी उबाठा गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असताना मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत शिवसेनेची बैठक उधळून लावली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनीही बैठक आटोपती घेत बैठक कक्ष खाली केला.
भाजपची बैठकही होऊ दिली नव्हती
म्हणजे, यापूर्वी देखील मराठा आंदोलकांनी या ठिकाणी भाजपची बैठकही होऊ दिली नव्हती. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध संघटनांनी सकल मराठा समाजाच्या नावाखाली आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रम आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते खासगी विमानाने सकाळी 11 वाजता विमानतळ येथे येणार आहेत. त्यानंतर, वाहनाने हदगाव येथील माजी आमदार नागेश आष्टीकर यांच्या कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावतील. परत नांदेडमार्गे मुंबईला रवाना होतील, अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अजूनही ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी साखळी उपोषण अजूनही केले जात आहे. सोबतच, आज जालना येथील आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देखील जिल्ह्यातील काही मराठा आंदोलक हजर राहणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक असल्याचे दिसत आहे. तर, आंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.