आंतरवाली सराटी,दि.9: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. म्हणाले आम्हाला आरक्षण द्या नाहीतर विधानसभेला नाव सांगून उमेदवार पाडू असं चॅलेंज सरकारला दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून (दि.8) पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याच पक्षाला जाहीर पाठिंबा दिला नव्हता.
भाजपा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी रॅली काढणार आहे. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला मजाच बघा, तुम्ही कितीही रॅली काढा, तुम्हाला रपारप पाडणार, असं म्हणत जरागेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा अंगावर घेतलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका जे घडलेले आहे ते मान्य करा. मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाचा फायदा करून द्या आम्हाला आरक्षण द्या, गुन्हे मागे घ्या, मला राजकारणात जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्या, जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता आम्ही पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ.” असे म्हणत, जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांसोबत बोलत होते.