सोलापूर,दि.8: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात मोठे वक्तव्य केलं आहे. मला गोळ्या घातल्या तरी हसत हसत मरण पत्करेन, पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार, असा निर्धार व्यक्त करून विधानसभेला आपण लढायचे की, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडायचे याचा फैसला येत्या 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे करू, अशी घोषणा मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात मराठा बांधवांसमोर सोलापुरात बोलताना केली.
मराठा आरक्षण व कुणबीमध्ये सग्यासोयऱ्यांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवारी सोलापुरातून झाली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत जरांगे बोलत होते. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
भाषणात जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, प्रवीण दरेकर, अॅड. प्रकाश आंबेडकर, शरद पवार या सर्वांवर टीका केली. मराठा आरक्षणाला उघडपणे विरोध करणारे छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस हे ज्या मतदारसंघात घेऊन जातील तेथील त्यांचा उमेदवार पाडा, असे आवाहन करत जरांगे यांनी माढा तालुक्यातील अरण येथे फडणवीस आणि भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत दोघांवरही निशाणा साधला.
त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी निवडणूक लढवायची की अन्य उमेदवार पाडायचे हा निर्णय अंतरवाली सराटी येथे एकत्र बसून घेण्यात येणार असून असून या बैठकीस मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजातील लोकांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नये. समाजाला बाप मानून काम करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘तिनही बाजूंनी यांनी मराठ्यांचं वाटुळं केलं आहे. तुम्ही दहा टक्के आरक्षण देऊन आमचं वाटूळं केलं. EWS रद्द करुनही मराठ्यांचं वाटुळ केलं आहे’, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केला.
भाजप संपणार आहे
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले, दोन दिवसापूर्वी आंबेडकर यांनी सगेसोयऱ्याची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं सांगितलं होतं. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते आता सत्तेत कुठे आहेत. त्यांना मान्य आहे की नाही यापेक्षा आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे हे महत्वाच आहे. आश्वासन पूर्ण केलं नाहीतर सरकार जाणार, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. सरकार फक्त भुजबळ यांचे ऐकत आहे, त्यांना बळ देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यांना आता भोगाव लागणार आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. या लोकांमुळे राज्यातील भाजप संपणार आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.