जालना,दि.20: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके आमचे विरोधक नाहीत असे म्हटले आहे. लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याकरिता उपोषणाला बसले आहेत. लक्ष्मण हाके आमचे विरोधक नाहीत. आमचे विरोधक भुजबळ आहेत. बोलायची कुवत नाही. राज्यातील एका ही ओबीसी बांधवांना दुखवले नाही. एकही धनगर नेत्याला बोललो नाही. त्यांना विरोधक मानले नाही. मानणार नाही. आम्ही धनगर, वंजारी बांधवांचे आरक्षण मानत नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो. तुम्ही 1700 उमेदवार उभे करा, आम्हाला काय करायचे?
तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आणि कुणबी एकच आहे. आमचे हक्काचे आरक्षण द्या. सगेसोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, दिले नाही, तर मराठे सुपडा साफ करणार आहे. समाज जे म्हणेल ते मी करणारा आहे. कितीही गोड बोलले तरी लोकसभेनंतर आता विधानसभेत दाखवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षण यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पण राज्य सरकारला इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास
देवेंद्र फडवणीस यांच्यावर माझा विश्वास आहे. 13 तारखे पर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार. आम्हाला भिडवत ठेवतील तर हे पडतील. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर यांना 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी येत्या 13 तारखेपर्यंत सरकारला अवधी दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्यातील दौऱ्याचे नियोजन सुद्धा केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.