मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

0

जालना,दि.28: मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बीड येथील इशारा सभेत (दि.२३ डिसेंबर) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली होती. राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याची टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता कुणाचं ऐकणार नसून आंदोलन करणारच असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत त्यांचं आंदोलन होणार आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दांचा सन्मान ठेवला. जे जे मंत्री आले त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांचा सन्मान केला. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला.

नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत आहे. लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मुंबईत येऊ द्या. तुम्ही असं काय करत आहात? तुम्ही कायदा का पायदळी तुडवता. तुम्ही शांततेचं आंदोलन होऊ द्या. ते होणारच आहे. तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मागे हटत नाही आता, असं जरांगे पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here