बीड,दि.12: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यानिमित्त नारायणगडावून संबोधित केले. मला चारही बाजुने पूर्ण घेरलंय, मला संपवण्यासाठी कारस्थान सुरुय. माझा नाविलाज आहे. माझ्या समाजाच्या लेकरांना त्यांच्यामुळे कलंक लावून देऊ नका. मी तुमच्यात असो वा नसो. माझा समाज आणि लेकरांना संपवू देऊ नका, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
माना आमच्या कापल्या, पण न्याय तुम्हाला दिला
मनोज जरांगे यावेळी भावनिक झाले होते. मराठा समाज हा देश आणि राज्य पुढे जावं म्हणून झिजला आहे. हातात तलवारी घेतल्या. माना आमच्या कापल्या, पण न्याय तुम्हाला दिला. रक्त आमचं सांडलं. अन्यायाचा विनाश आम्ही केला. अत्याचाऱ्यांचे अड्डे आम्ही उद्धवस्त केले. मग आमच्यावर अन्याय काय? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला.
17 जाती आरक्षणात घातल्या, आता तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठेय? आमच्यात येऊ नको म्हणणारा कुठेय? मराठ्यांचा इतका द्वेश का? तुम्ही सरकारकडून लिहून घेतलं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
उचलून फेकावे लागणार
तुम्ही कितीही आंदोलने करा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून निर्णय घेतलाय, असे ते म्हणाले. आपल्यावर आपल्या डोळ्यादेखत अन्याय करत असले तर समोरच्याला उचलून फेकावे लागणार, असे जरांगे म्हणाले. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार असल्याचे विधान यावेळी त्यांनी केले. इथून मला सर्वकाही सांगता येणार नाही. आता सर्व जवळ आलंय. त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. एकाएकी उलटा निर्णय घ्यायचा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमचा मान, शान, लेकरं सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकार उलथवून टाकायला हा समाज मागे पाहणार नाही, असा थेट इशाराच जरांगेंनी दिला.