इथल्या तिथल्या चर्चा करू नका, मुद्द्यावर बोला; मनिष सिसोदिया यांची केंद्र सरकारवर टीका

0

नवी दिल्ली,दि.13: उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या मित्रांचे 15 लाख कोटी माफ केल्यानंतर पंतप्रधान मोदी आता काहीच मोफत मिळणार नाही असं म्हणत आहेत, अशी टीका सिसोदिया यांनी यावेळी केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीच्या कारणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था झाल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला.

“आपल्या मित्रांवरील 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज आणि 5 लाख कोटी रुपयांचा टॅक्स माफ करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला इतक्या वाइट स्थितीत का ढकललं? असा माझा पंतप्रधानांना प्रश्न आहे. इथल्या तिथल्या चर्चा करू नका, मुद्द्यावर बोला. गेल्या 75 वर्षात असं कधीच झालेलं नाही”, असं मनिष सिसोदिया म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

– देशात आज चक्क पीठ आणि तांदुळावरही कर लावला जात आहे. 
– गरीब व्यक्तीला आपल्या मुलांना दूध-दही विकत घेऊन द्यायचं असेल तर त्यालाही कर भरावा लागत आहे. 
– देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकार आता म्हणतंय की आमच्याकडे पैसे नाहीत. 
– सरकारी शाळा सरकार उभारू शकलं नाही, सरकारी रुग्णालयं उभारू शकलं नाही, वृद्धांना पेन्शन दिली नाही, गरीबांसाठी चांगल्या योजना सरकार देऊ शकलं नाही. देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
– देशातील जनतेनं कराच्या रुपात दिलेल्या पैशानं मोदीजींच्या मित्रांची तिजोरी भरण्याचं काम झालं आहे. 
– देशातील करदात्या जनतेनं सरकारकडे यासाठी कर जमा केला आहे की त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण, शाळा आणि आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. 
– पण सरकार आता म्हणतंय की जनतेला कोणतीच गोष्ट मोफत मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतील. मग ते लहान मुलांना रुग्णालयात दाखल करणं असो किंवा मग शाळेत प्रवेश देणं असो. सर्वांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here