सोलापूर,दि.28: Manish Kalje Solapur: सोलापुरात जडवाहतुकीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. बेशिस्त जडवाहतुकीमुळे दररोज अपघात होत आहेत. अशा बेशिस्त जेड वाहनांवर व ट्रॅफिक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनिष काळजे (Manish Kalje) यांनी केली आहे. जड वाहतुकीमुळे शहरात काल एका बालकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर काळजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
चिमुरड्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू | Solapur Accident
सोलापूर शहरातील शांती चौकाजवळील शासकीय तंत्रनिकेतनजीक तानाबानासमोरील आणखी एका चिमुरड्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू (Solapur Accident) झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी दीड वाजता घडली. नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीवरुन आलेल्या आजी-आजोबांसमोरच जडवाहतुकीने मुलाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या चार दिवसांत जडवाहतुकीने दुसरा बळी घेतल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. असद अल्ताफ बागवान (वय 3, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. मुमताज सरदारबाबू बागवान (वय 45) असे जखमी आजीचे नाव आहे. सरदारबाबू बागवान यांचे शास्त्रीनगर भागात नातेवाईक राहतात. शुक्रवारी सकाळी सरदारबाबू आणि मुमताज हे त्यांना भेटण्यासाठी दुचाकीवर (एमएच 13 बीएस 8371) वरुन सोलापुरात आले होते. सरदारबाबू हे दुचाकी चालवित होते. तर मुमताज पाठीमागे बसल्या होत्या. दोघांच्या मध्ये असद हा बसला होता.
शांती चौकातून सरदारबाबू यांची दुचाकी अशोक चौकाच्या दिशेने वळली. तानाबानासमोरील रस्त्यावरून जाताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच 13 सीपी/ 0994) दुचाकीला ठोकरले यामध्ये असद आणि मुमताज दुचाकीवरून खाली पडल्या. तेव्हा ट्रकखाली सापडल्याने असदचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर मुमताज यांच्या हाताला व चेहऱ्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. यात सरदारबाबू यांना इजा झाली नाही.
काय म्हणाले मनिष काळजे | Manish Kalje Solapur
सोलापुरात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अपघाताची मालिका थांबत नाहीये. या करिता जबाबदार असणाऱ्या पोलीस ट्रॅफिक कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे.आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मार्फत दोन दिवसाची मुदत देतोय असे मनिष काळजे यांनी म्हटले आहे. दोन दिवसात जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सोलापुरात ज्या ठिकाणी हे जड वाहने दिसतील त्या ठिकाणी ती शिवसेना स्टाईलने फोडण्यात येतील. आणि पुढील घडणाऱ्या घटनेला हे पोलीस कर्मचारी ट्रॅफिक हे जबाबदार राहतील, काळजे यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.