लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून पुरुषाने बुरखा घालून केला प्रवास

0
लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून पुरुषाने बुरखा घालून केला प्रवास

मुंबई,दि.८: लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून पुरुषाने बुरखा घालून प्रवास केल्याचा प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानक परिसरात घडली आहे. ही घटना घडल्याने लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपी सध्या फरार आहे. शुक्रवारी दुपारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांना बुरखा घातलेल्या एका प्रवाशाबद्दल संशय आला. त्यांनी त्याला विचारपूस केली असता तो पुरुष असल्याचे उघड झाले. 

गर्दीचा फायदा घेत संबंधित आरोपीने बुरखा परिधान करत महिलांच्या डब्यात प्रवेश केला. सुरुवातीला तो पुरुष असल्याचा संशय कोणालाही आला नाही. मात्र, प्रवासादरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने काही महिलांनी त्याच्याकडे बारकाईने निरीक्षण केले. त्यानंतर संबंधित व्यक्ती पुरुष असल्याचे स्पष्ट होताच महिलांमध्ये एकच खळबळ उडाली.

महिलांनी त्याला महिला डब्यात का चढलात आणि बुरखा का घातला, असा जाब विचारला. काही महिलांनी त्याचा मोबाईलवर व्हिडिओही काढला. पुढील घाटकोपर स्थानकात पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र, गाडी घाटकोपरला पोहोचण्याआधीच त्या व्यक्तीने डब्यातून उडी मारून रुळांवर उतरून पळ काढला. त्यानंतर तो दुसऱ्या फलाटावर जाऊन कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढल्याचे समोर आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here