मुंबई,दि.७: तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये महमूद अली हे त्यांच्या अंगरक्षकाच्या श्रीमुखात भडकावताना (कानशीलात लगावताना) दिसत आहेत. महमूद अली हे तेलंगणाचे पशूसंवर्धन मंत्री श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी एका क्षुल्लक कारणावरून त्यांच्या अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली.
या व्हायरल व्हिडीओत दिसतंय की, गृहमंत्री महमूद अली यांनी श्रीनिवास यादव यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुश्पगुच्छ घेण्यासाठी ते त्यांच्या अंगरक्षकाकडे वळले आणि त्याच्या दिशेने हात केला. तेवढ्यात अंगरक्षक त्यांच्याजवळ आला. अंगरक्षकाच्या हातात पुष्पगुच्छ नसल्याने महमूद संतापले आणि त्यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार हा व्हिडीओ कालचा (६ ऑक्टोबर) आहे. टी. श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलेल्या महमूद अली यांना त्यांच्या अंगरक्षकाने पुष्पगुच्छ वेळेत दिला नाही, म्हणून त्यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली. तर श्रीनिवास यादव यांनी महमूद यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीटीआयने महमूद अली यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे. यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रया येत आहेत. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना महमूद अली यांच्यावर टीका केली आहे, तसेच लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.