सोलापूर,दि.१: Mahesh Kothe: सोलापुरात पहिले आयटी पार्क सुरू होणार आहे. माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सोलापुरात आयटी पार्क व्हावे अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा याकरिता अन्य जिल्ह्यात व परराज्यात जावे लागत होते. महेश कोठे अनेक वर्षापासून सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे याकरिता प्रयत्नशील होते.
सोलापूर येथील डोणगाव रस्त्यावरील ७५ एकर जागेत आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून आठशे कोटींची गुंतवणूक करून पहिले आयटी पार्क साकारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन येत्या २ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे व आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी दिली.
मी केले तुम्ही करून दाखवा | Mahesh Kothe
आयटी पार्कचे भूमिपूजन झाल्यानंतर तीन महिन्यात सोलापूरच्या आयटी तरुणांना येथे नोकरी मिळेल. पहिल्या टप्प्यात टेक्निकलच्या दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या तीन हजार तरुणांना सुरुवातीच्या वर्षांमध्ये काम मिळेल. तीन वर्षांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने मी गेल्या सहा वर्षांचे स्वप्न पूर्ण करत आहे. आता इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी करून दाखवावे आणि शहराच्या विकासात भर घालावी, असे आवाहन माजी महापौर महेश कोठे यांनी केले.
या आयटी पार्कमध्ये आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या येणार आहेत. तसेच रोबोट तयार करणाऱ्या कंपनीचादेखील समावेश आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत या आयटी पार्कचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. त्यानंतर दहा ते पंधरा हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.
या आयटी पार्कमुळे शहरात आयटी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूरमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी एक पोषक वातावरण तयार होणार असल्याचे आर्यन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांनी सांगितले.
आर्यन्स ग्रुप काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक आहे. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउजर देखील बनवत आहे. याचे सर्व कामकाज सोलापुरातून होणार आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटी पार्कसह इतर प्रकल्पांसाठी जागा मिळाल्यास ८०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
आर्थिक विकासाला चालना मिळणार
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी शहरामध्ये आयटी पार्क उभारत आहे. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला हे साध्य करणे शक्य झाले आहे. या अत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून या भागात आर्थिक विकासाला चालना तर मिळणार आहेच, त्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होणार आहेत. मनोहर जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, आर्यन्स ग्रुप
२ ऑगस्ट २०१३ रोजी या आय.टी. पार्कचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अतुल चोरडीया, सतीश मगर व आय.टी. क्षेत्रातील महत्वाचे संचालक उपस्थित राहणार आहेत. कंपनी आपल्या ह्युमनाईड रोबोट स्वतःचे देखील अनावरण करणार आहे. रोबोटला कोणाचाही चेहरे देता येतो. रोबोट घरातील व ऑफीसमधील कामे सक्षमपणे करतो असेही मनोहर जगताप यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर महेश कोठे संजय शेंडगे, किरण लोहार, प्रथमेश कोठे, विद्या लोलगे, विनायक कौड्याल आदी उपस्थित होते.