मुंबई,दि.30: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा तोडगा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच काढू शकतात, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहेत. जर केंद्र सरकारने सर्वमान्य असा तोडगा काढला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे स्पष्ट केले आहे.
आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नाही, तो अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी दिल्लीत चला, मोदींना लक्ष घालायला सांगा, ते देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं उध्दव ठाकरे म्हणाले. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका मांडली.
”आऱक्षणाबद्दल माझी भूमिका मी संभाजीनगर दौऱ्याच्या वेळी स्पष्ट केली होती. या सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवण्याचं नाटक केलं होतं. पण या सरकारचं आरक्षणाचं बिल जेव्हा विधानसभेत मांडलं तेव्हा त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. पण माझं म्हणनं की राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं व सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”आऱक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहार सरकारने वाढवलेली आऱक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने हटवली. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेतच हा प्रश्न सुटू शकतो. माझे खासदार पाठिंबा द्यायला तयार आहेत. मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या नेत्यांनी एकत्र मिळून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जावं. मोदी नेहमी सांगतात की ते पिछडे जाती जमातीचे आहेत. त्यांनी गरिबीतला संघर्षाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे याबबात मोदीच निर्णय घेऊ शकतील. त्यांनी दिलेला सर्वमान्य निर्णय आम्हाला मान्य असेल.”