Raj Thackeray On Politics | महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली आहे: राज ठाकरे

0

मुंबई,दि.२१: Raj Thackeray On Politics: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली आहे. अशी परिस्थिती मी आधी कधीही पाहिली नाही. मला या सगळ्या गोष्टींचा वीट येऊ लागला आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. ते लोकमान्य सेवा संघ पार्लेच्या शतकपूर्ती निमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मी अपघाताने राजकारणात आलो आहे | Raj Thackeray On Politics

यावेळी मुलाखतकाराने तुमच्यातला व्यंगचित्रकार सदैव जागा असेल तर तो तुमच्यातल्या राजकीय नेत्यावर कुरघोडी करतो का? असा सवाल विचारला असता राज ठाकरे म्हणाले, “नाही, तशी वेळ येत नाही. मी तशी वेळ येऊ देत नाही. खरं सांगायचं झालं तर, मागे मी एकदा माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की, मी अपघाताने राजकारणात आलो आहे. माझ्या घरात राजकीय वातावरण होतं. त्यातून मी राजकीय व्यंगचित्रकार झालो. त्या सगळ्या वातावरणात मी वाढलो.”

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ आहे

“पण आताचं महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर मी या राजकारणात योग्य नाही, असं मला वाटतं. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ आहे. आतापर्यंत मी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही. याला सोशल मीडिया कारणीभूत आहे, असं मला वाटतं. कारण कुणीही व्यक्त व्हायला लागलंय. त्यांच्या व्यक्त होण्याला पैसे लावले पाहिजे, तरच ते गप्प होतील. कुणी काहीही बोलतंय. हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय. मी यावर अनेकदा बोललो आहे,” असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

“मला आता या सगळ्या गोष्टींचा वीट यायला लागला आहे. येथे अनेक लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं आहे, पण असा महाराष्ट्र कधी कुणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here