मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका

0

मुंबई,दि.16: मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झालं, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला कायद्यानुसार आरक्षण मिळणं शक्य नाही, त्यामुळे अचानक निवडणुकांपूर्वी जरांगे पाटील यांच्या सुरू झालेल्या आंदोलनामागे कोणीतरी आहे, अशी शंकाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. जरांगे यांच्या मागे कोण आहे? हे कालांतराने समोर येईल, असंही राज ठाकरे म्हणाले.

‘याप्रकारचं कोणतंही आरक्षण कधीही मिळणार नाही, हे मी त्यांच्यासमोर त्यादिवशी सांगून आलो होतो. आता ते जरांगे पाटील आहेत, का त्यांच्या मागून कोणी आहे? जातीयवादातून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलं आहे? कारण निवडणुका तोंडावर असताना या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे काही सरळ चित्र दिसत नाही. कालांतराने या मागे कोण आहे, हे कळेलच,’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

‘1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्याच्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं, हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झालं. आपण जर असेच वागायला लागलो, तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही,’ असा निशाणा राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर साधला.

दरम्यान मनोज जरांगेंनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आरक्षण मिळणार नाही म्हणून बातम्या पेरल्या जात असून राज ठाकरेंनी जे आरोप केले आहेत, त्यांनी ते शोधून काढावं, असं जरांगे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here