मुंबई,दि.८: अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विधासनसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. अजित पवारांचा सध्या कुणाचाही संपर्क होत नसून, राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल असल्याची अफवा माध्यमांत आणि सोशल मीडियात उठली आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपविधीचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यावर, “किळसवाणे राजकारण, मी पुन्हा येईन,” असं अंजली दमानिया यांनी लिहले आहे.
शरद पवार यांचे स्पष्टीकरण | Sharad Pawar
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अजित पवार आमदारांसह नॉटरिचेबल आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी म्हटलं, “मला याबद्दल माहिती नाही. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत. उद्या सुप्रिया सुळे नॉटरिचेबल असल्याचं म्हणतील. त्या घरात आहेत, पण तुमच्या समोर नाहीत,” अशी मिश्कील टिप्पणीही शरद पवारांनी केली आहे.
अजित पवार यांचे स्पष्टीकरण | Ajit Pawar
अजित पवार यांनीही यावरती स्पष्टीकरण दिले आहे. “माध्यमांत काहीपण दाखवण्यात आलं, यांचं मला वाईट वाटते. माध्यमांनी हे बंद करावे. कुठे आहात, याची माहिती घ्यावी. कारण, नसताना एखाद्याची बदनामी करायची तर किती? वृत्तपत्रात रकाने भरून बातम्या आल्या आहेत. हे बरोबर नाही, एवढेच मला सांगायचे आहे,” असं अजित पवारांनी सांगितले आहे.