नाशिक,दि.4: Satyajeet Tambe On Congress: उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं की, मी काँग्रेसचा उमेदवार आहे, हे माझं पहिलं वाक्य होतं. माझ्या वडिलांनी तर महाविकास आघाडी शब्द देखील वापरला होता, की आम्ही महाविकास आघाडीचे आहोत, मात्र तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून ढकलण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला आहे.
सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका केली स्पष्ट | Satyajeet Tambe
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर ते काँग्रेस पाठिंबा देणार की भाजपाला याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
सत्यजीत तांबे काय म्हणाले?
यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, “मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. २०३० मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन १०० वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.”
मी अपक्षच राहणार
दरम्यान, आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला? असे विचारलं असता, “मी अपक्ष निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार”, असंही ते म्हणाले.
काँग्रेसवर गंभीर आरोप | Satyajeet Tambe On Congress
पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोपही केले आहेत. “बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होतं,” असं ते म्हणाले. तसेच “महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवारांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.