मुंबई,दि.२८: Sanjay Raut On BJP: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. वीर सावरकर काय आहेत ते आम्हाला कुठल्याही ढोंग्यांनी सांगायची गरज नाही. आम्ही वीर सावरकर जगलो आणि जगतो आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच वीर सावरकर यांचं हिंदुत्व आम्ही स्वीकारलं आहे कारण वीर सावरकर यांचं हिंदुत्व हे विज्ञानवादी होतं. हे हिंदुत्व भाजपाला मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडून काय करायचं? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही… | Sanjay Raut On BJP
आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व वीर सावरकर यांचं हिंदुत्व आहे. वीर सावरकर यांचं हिंदुत्व हे विज्ञानवादी होतं. हे भाजपाला मान्य आहे का? वीर सावरकरांचं गोमातेवरचं मत त्यांना मान्य आहे का? त्यामुळे कुठल्याही ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर शिकवू नये. राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा नाही तर अदाणी बचाव यात्रा काढली जाणार आहे असाही टोला त्यांनी लगावला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान
यानंतर संजय राऊत यांना विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे वीर सावरकर यांच्या मुद्यावरून काँग्रेसची साथ सोडायची का? त्यावरही संजय राऊत यांनी उत्तर दिलं. एवढंच नाही तर संजय राऊत म्हणाले की माझी आज राहुल गांधी यांच्याशी भेट होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मी हा सगळा विषय बोललो आहे. त्यांना आम्ही आमची भूमिका समजावून सांगितली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं श्रद्धास्थान आहेत. हे आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं आहे. एवढंच नाही तर एक बैठक झाली त्यात शरद पवार यांनीही वीर सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही असं म्हटलं. या मताचा आपण आदर करतो असं राहुल गांधीही म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या धोरणात बदल होईल अशी आशा आहे. आम्हाला कुठल्याही ढोंग्यांनी वीर सावरकर म्हणजे काय ते शिकवण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. तसंच उद्धव ठाकरेंची या लोकांना भीती वाटते म्हणूनच महाविकास आघाडीतून बाहेर पडायला सांगत आहेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
तुमच्या मांडीला मांडीला मांडी लावून बसायचं?
“भारतीय जनता पक्ष म्हणतोय की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडावी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं. कशासाठी बाहेर पडायचं उद्धव ठाकरेंनी? तुमच्या मांडीला मांडीला मांडी लावून बसायचं? तुम्ही ज्या गद्दारांना मांडीवर घेऊन बसला आहात त्या मांडीवर आम्ही बसायचं? गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होईल आणि दिल्लीतही २०२४ मध्ये बदल होईल. भाजपाला शिवसेनेची भीती वाटते आहे. महाविकास आघाडीत शिवसेना असल्याने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल ही भीती भाजपाला वाटते आहे.”