खेड,दि.१९: Ramdas Kadam On Uddhav Thackeray: दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं.
माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही, हे योगेश कदमनं दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे झोपतात कधी, उठतात कधी याचं संशोधन सगळीकडे चालू आहे. दिवसरात्र काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत असे खेडच्या सभेत शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले.
उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? २००९मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो मी, असे कदम म्हणाले.
दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे, मला तुम्ही ४ वर्षं भेटला नाहीत. मी तुमचे काय घोडे मारले ते एकदा सांगा ना तुम्ही. मलाही कळू द्या. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे गेल्यानंतर पक्ष संकटात आला, तेव्हा वर्षभर मला गाडीत बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. मी गोळी झेलेन पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही हे मी शिवसेनाप्रमुखांना सांगत होतो. याची परतफेड केलीत का? असा सवाल कदम यांनी विचारला.
बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही… | Ramdas Kadam On Uddhav Thackeray
गद्दार एपी, उद्धव ठाकरेंचा कलेक्टर. तो १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला यायचा. फक्त योगेश कदमला कसं संपवायचं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते, कटात नव्हतात. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता हलवायला. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे असा घणाघात कदम यांनी केला.
ज्या रामदास कदमनं कोकणात खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली. आणि आमच्यावर खोक्यांचा आरोप लावताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असे म्हणत रामदास कदम यांनी जोरदार टीका केली.