मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान बदलले, आता ते राष्ट्रवादीचे गटनेते होऊ इच्छित आहेत: जयंत पाटील

0

मुंबई,दि.१३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलताना राष्ट्रपती ऐवजी पंतप्रधान द्रौपदी मुर्मू असा उल्लेख केला होता. चूक लक्षात आल्यानंतर लगेच शिंदे यांनी राष्ट्रपती असा उल्लेख केला होता. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यातच विविध मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे नेते आमनेसामने आल्याचे दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचे पत्र निघाल्याची मोठी चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून देत टोलेबाजी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत मोठी चूक समोर आली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. पण, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले. यावरून जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला. विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली. 

मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान बदलले, आता ते…: जयंत पाटील

विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, १० मार्चला एक पत्रक निघाले आहे. त्यात विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद गटनेते प्रतोद पद रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे. ही चूक अजूनही विधिमंडळाच्या वेबसाईटवर आहे. मुख्यमंत्र्यांनी तर देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू आहेत, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे विधिमंडळाचं गटनेते पद धोक्यात आल्यासारखं दिसत आहे. नागालँडमध्ये मुख्यमंत्री रिओ हे सर्व पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. ही नवीन पद्धत एकनाथ शिंदेंनी सुरु केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

दरम्यान, जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही. पण, विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here