नवी दिल्ली,दि.27: कपिल सिब्बल यांच्याकडून मोठा युक्तीवाद करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दहाव्या अनुसूचीसंबंधी निवडणूक आयोगाने आपला काही संबंध नसल्याचं निवडणूक आयोगाचं मत चुकीचं असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला पाठवलेल्या नोटिशीचं वाचन केलं आणि ती कशी चुकीची आहे याबद्दल मत मांडलं. उद्धव ठाकरे हेच 2023 पर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत असाही युक्तीवाद त्यांनी केला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या युक्तीवादावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तीवाद केला.
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
निवडणूक आयोगाने दहाव्या अनुसूचीचा आणि पक्षाच्या फुटीचा काही संबंध नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. आमदार जरी अपात्र ठरले तरी राजकीय पक्षाचे सदस्य असतात हे आयोगाचं मत चुकीचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. तसेच दहाव्या अनुसूचीचा यामध्ये काही संबंध नाह हे मत कसं चुकीचं आहे हे न्यायालयाच्या निर्दर्शनाला आणलं.
ही नोटीस चुकीची असल्याचं सांगत कपिल सिब्बल म्हणाले की, निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीची सुरुवातच अशी होती की शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत हे निवडणूक आयोगानं कसं ठरवलं? जर शिंदे गटाकडून सांगितलं जातंय की ते शिवसेनेत आहेत, ठाकरे गटाकडूनही असंच सांगितलं जातंय, तर मग निवडणूक आयोगाने कसं ठरवलं की शिवसेनेत दोन गट पडलेत?
उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष
उद्धव ठाकरे हेच 2023 पर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, तशा प्रकारची कागदंपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहेत. त्यानुसार आता शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच असतील, निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर हेच आहे असा युक्तीवादही कपिल सिब्बल यांनी केला.
एकनाथ शिंदे हे प्राथमिक सदस्य नाहीत
एकनाथ शिंदे हे पक्ष कार्यकारिणीचे प्राथमिक सदस्य नाहीत. ते थेट निवडून आलेले नाहीत, ते नामनिर्देशित सदस्य असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले. आता त्यांनी स्वेच्छेने ते सोडलं आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांकडे असेल असा युक्तीवाद करण्यात आला.