गुवाहटी दि.26: maharashtra political crisis explained: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्राचे राजकीय संकट आता सर्वोच्च न्यायालयाच्या पोहोचले आहे. गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अपात्रतेच्या नोटिशीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रत्यक्षात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या जागी आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी आणि सुनील प्रभू यांची विधानसभेत प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यासही आव्हान देण्यात आले आहे.
पहिली याचिका शिंदे यांची असून अपात्रतेच्या कारवाईबाबत आहे. तर दुसरी याचिका आमदार भरत गोगावले यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. त्यातच विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आणि प्रतोद यांच्या नियुक्त्यांमध्ये बदलांना आव्हान देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी त्यांच्या याचिकेची प्रत या प्रकरणी प्रतिवादी महाराष्ट्र सरकारला यापूर्वीच पाठवली आहे, जेणेकरून कोर्टातील नोटीसचा वेळ वाचेल. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्दीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सकाळी 10.30 वाजता सुट्टीतील खंडपीठ आणि निबंधक यांच्यासमोर तातडीने सुनावणीसाठी नमूद करणे अपेक्षित आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती आणि उपसभापतींविरोधात अपक्ष आणि भाजप आमदारांनी पाठवलेला अविश्वास ठराव फेटाळण्यालाही शिंदे गटाने आव्हान दिले आहे. दुसऱ्या याचिकेत बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणीही गोगावले यांच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. ज्यांना 27 जूनच्या सायंकाळपर्यंत उत्तर द्यायचे आहे. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील बंडखोर शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत अपात्रतेच्या नोटीसच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेसोबतच उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवरही कारवाई करू शकतात, असे मानले जात आहे. त्यात एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्यासह काही मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत 9 मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदारही शिंदे गटाच्या पाठीशी उभे आहेत. यापूर्वी उपसभापती नरहरी झिरवाळ यांनीही आपल्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाची याचिका एका निनावी मेल आयडीवरून पाठवण्यात आली, यासाठी आमदारांना पुढे यावे लागेल, असे सांगत फेटाळून लावली होती.